खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू….नियम भंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स वर दंडात्मक कारवाई
दिवाळी सणा निमित्त खाजगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांच्या किमतीत वाढ होते अशी प्रवाशांची तक्रार असते आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत ट्रॅव्हल्स संघटनांसोबत चर्चा करून त्यांना नियमापेक्षा जास्त तिकीट दर आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.यासाठी सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू केली आहे. दोन दिवसात सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झडती घेतली असून त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सनी नियम भंग केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नियम भंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय साताऱ्याच्या वतीने राज्य महामार्ग व जिल्हा महामार्गावर वायुवेग पथकाची नेमणूक केल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हात्रे यांनी दिली. या पथकाला 213 ट्रॅव्हल्सच्या तपासणीमध्ये 71 ट्रॅव्हल्स दोषी आढळल्या. त्यामध्ये टप्पा वाहतूक विनापरवाना,योग्यता प्रमाणपत्र, टेल लाईट, प्रवासी बस मध्ये अवैधरीत्या मालवाहतूक,परवान्याच्या अटीचा भंग, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक या बाबी आढळून आल्या. जिल्हा महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅव्हल्स वाहतुकीची तपासणी आरटीओ च्या वायुवेग पथकामार्फत करण्यात येत आहे. दिनांक ९ नोव्हेंबर अखेर ही ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू राहील व नियम भंग करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई सुरू आहे व यापुढेही कारवाई सुरू राहील असा आदेश सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिला आहे.
