महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवात ड्रोनवर कडक निर्बंध; पुणे पोलिसांकडून ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सध्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय आणि भक्तीमय झाले आहे. गणेशोत्सवाचा हा आनंदोत्सव कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आणि सोशल मीडियावर आकर्षक रिल्स किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाईची मोठी धडपड सुरू आहे. मात्र, याच उत्साहाच्या ओघात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून शहराच्या मध्यवर्ती व गर्दीच्या भागात विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पुणे पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यापुढे प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्यांवर थेट फौजदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्यांचे ड्रोन जप्त करण्यासाठी विशेष ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

     गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत बाप्पाच्या आगमन मिरवणुका आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांना लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. या महाकाय गर्दीचा फायदा घेत अनेक व्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि हौशी ऑपरेटरकडून कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय हवेत ड्रोन उडवून चित्रीकरण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले. विशेषतः पुण्यातील मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या गजबजलेल्या भागात विनापरवाना ड्रोन उडवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गणेशोत्सवातील अलोट गर्दीचे व्यवस्थापन, संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणांची कडेकोट सुरक्षा आणि अनधिकृत ड्रोनमुळे ऐन उत्सवाच्या काळात निर्माण होणारा संभाव्य मोठा सुरक्षा धोका या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पोलिसांनी ही धडक कारवाई हाती घेतली आहे.

     या अनधिकृत प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरात विशेष ‘अँटी ड्रोन पथक’ सक्रिय केले आहे. हे पथक संपूर्ण शहरात, विशेषतः गर्दीच्या आणि संवेदनशील गणेश मंडळांच्या परिसरामध्ये संशयास्पद किंवा विनापरवाना ड्रोनच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून असणार आहे. जर कोणीही व्यक्ती, व्लॉगर किंवा फोटोग्राफरने नियम मोडून विनापरवाना ड्रोन उडवल्याचे आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर केलीच जाईल, शिवाय संबंधित अत्याधुनिक ड्रोनही जागेवरच जप्त केला जाईल. केवळ सोशल मीडियावरील व्ह्यूज, लाइक्स आणि रिल्स बनवण्यासाठी नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आता पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे मोठा दणका बसणार आहे. सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था ही प्रशासनासाठी सर्वोच्च प्राथमिकता असून सर्व ड्रोन ऑपरेटर, व्लॉगर्स आणि छायाचित्रकारांनी प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!