महत्त्वाच्या बातम्या

गोंदवले गुरुपौर्णिमा उत्सव: सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा

दहिवडी (विशेष प्रतिनिधी):

माण तालुक्यातील मौजे गोंदवले बुद्रुक येथील प्रसिद्ध श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा-पंढरपूर मार्गावर वाहतुकीचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. २९ जुलै रोजी दिवसभर या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून, याबाबतची अधिकृत अधिसूचना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रसिद्ध केली आहे.

भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय

गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले येथे राज्यभरातून ७० ते ८० हजार भाविक दर्शनासाठी दाखल होतात. या कालावधीत रस्त्यावरील तात्पुरती दुकाने, पार्किंग आणि भाविकांच्या रहदारीमुळे वाहतूक ठप्प होऊ नये, म्हणून २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजल्यापासून ते रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुख्य मार्गात बदल करण्यात आले आहेत.

असे असतील पर्यायी मार्ग:

  • सातारा बाजूकडून पंढरपूर / अकलूजकडे जाणारी वाहने:

    साताऱ्याकडून येणाऱ्या सर्व वाहनांना खांडसरी चौक (पिंगळी बु.) येथून वळवून दहिवडी – राणंद – मार्डी – म्हसवड मार्गे पंढरपूर आणि अकलूजकडे सोडले जाईल.

  • पंढरपूर / अकलूजकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने:

    १. म्हसवड – मायाणी – खांडसरी चौक मार्गे साताऱ्याकडे.

    २. म्हसवड – शिंगणापूर – फलटण मार्गे साताऱ्याकडे.

महत्त्वाची टीप (रस्ता बंद): पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक येथील अप्पा महाराज चौक या दरम्यानचा मुख्य रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्व वाहनधारक व नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!