महत्त्वाच्या बातम्या

गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर; १८ ऑक्टोबरला मतदान, दुसऱ्याच दिवशी निकाल

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अधिकृतपणे वाजला आहे. संघाच्या संचालक मंडळातील एकूण २५ जागांसाठी आगामी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन गोकुळच्या सत्तेची नवीन सूत्रे कोणाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी बुधवारी (९ सप्टेंबर) या बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर घोषणा केली असून, या घोषणे सह जिल्ह्यातील राजकीय व सहकार वर्तुळात जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे.

       या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १५ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. निवडणूक वेळापत्रका नुसार १५, १६, १७, २१ आणि २२ सप्टेंबर या पाच प्रमुख दिवशी इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दाखल झालेल्या सर्व अर्जांची छाननी २३ सप्टेंबर रोजी केली जाईल, तर २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या अंतिम रिंगणात टिकणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. गोकुळच्या २५ जागांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांनी आणि स्थानिक नेत्यांनी आता पासूनच जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

        गोकुळ हा केवळ दूध उत्पादकांचा एक व्यावसायिक सहकारी संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि अर्थकारणाचा मुख्य कणा मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागलेले असते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता आगामी काळात विविध राजकीय गट एकत्र येणार का, कोणामध्ये नव्या आघाड्यांची समीकरणे जुळणार आणि कोणकोणते पॅनेल एकमेकां समोर उभे ठाकणार, या बाबतच्या चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर संघामध्ये प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठा राजकीय वाद पाहायला मिळाला होता. आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम हातात पडल्याने संघावरील वर्चस्वासाठी होणारा हा राजकीय संघर्ष आगामी काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अर्ज दाखल करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदाना पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!