महत्त्वाच्या बातम्या

चित्रपटसृष्टीसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; रामटेक आणि नाशिकमध्ये फिल्म सिटी

मुंबई: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता अधिक उंचीवर नेण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असून, आता मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देणारा विशेष आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी नवी चित्रनगरी (फिल्म सिटी) लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

        मुंबईत दिमाखात पार पडलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

       या भव्य सोहळ्यात चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर आयुष्यभर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचा शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रतिष्ठेचा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. याशिवाय लोकप्रिय कथा-पटकथा लेखक सलीम खान यांना ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने’ गौरवण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही तरी सलीम खान यांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी हा सन्मान स्वीकारला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अखंड संगीत सेवेतून निर्माण केलेले स्वतंत्र संगीतविश्व, सलीम-जावेद या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले ‘अँग्री यंग मॅन’सह अनेक अजरामर आयाम, प्रसाद ओक यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात साकारलेली अत्यंत प्रभावी भूमिका आणि राणी मुखर्जी यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत मांडलेल्या स्त्रीकेंद्री भूमिकांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सविस्तर गौरव केला.

        कार्यक्रमा दरम्यान बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या आगामी विस्तारात्मक योजनांची माहिती दिली. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूर मधील चित्रिकरण सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच आता रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने राज्य शासनाने वेगाने काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष असल्याचा विशेष उल्लेख करून त्यांच्या मानवी मूल्यांवर आधारित कलाकृतींनी रसिकांचे जीवन समृद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.

       महाराष्ट्रात तयार होणारे मराठी तसेच इतर भाषेतील चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत आणि चित्रपट निर्माते, व्यावसायिक तसेच कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या राज्यस्तरीय सोहळ्यात उत्कृष्ट कला दिग्दर्शन, छायालेखन, संकलन, ध्वनीमुद्रण, ध्वनीसंयोजन, वेशभूषा, रंगभूषा आणि उत्कृष्ट बालकलाकार यांसह विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञ व कलाकारांनाही पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!