गोवंश कापणारा बरोबर विकणारावर सुद्धा मोका अंतर्गत कारवाई करा- सकल मराठी, मुस्लिम समाजाची मागणी
सातारा: गाय ही हिंदू बांधवांसाठी देवतेसमान आहे आणि कायद्यानुसार गोवंश हत्या करणे गुन्हा आहे . ज्यावेळेस गाईला माता समजून पूजा केली जाते आणि गोवंश पुजला जातो अशा वेळेस त्याच व्यक्तीकडून गोवंश हसते परहस्ते विक्री करणे म्हणजेच त्या गोवंशाला कसायाच्या तावडीत सोडणे असे आहे. त्यामुळे गोवंश विकणारा हा कापणारा पेक्षा दोषी आहे आणि गोवंश कापणारा बरोबर विकणारावर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी राजधानी सातारा येथून सकल मराठी मुस्लिम समाज व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यांच्यावतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली .
सकल मराठी मुस्लिम समाज व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा च्यावतीने प्रथम कुरेशी समाजाच्या कत्तल खाण्याला भेट देत प्रमुखांना निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाला भेटून निवेदनद्वारे बकरी ईदचे औचित्य साधून होणारे गैरप्रकार रोकण्याची विनती करण्यात आली. गोवंश हा विषय बकरी ईद आल्यावरच जिव्हाळ्याचा दाखविला जात असून ह्याच्या माध्यमातून चुकीचे प्रकार सुद्धा चालतात का ह्याची माहिती घ्यावी अशी मागणी प्रशासनाला देण्यात आली. रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड गोवंशा संदर्भात योग्य ती पाऊले उचलत प्रशासनाने गोशाळा काढाव्यात आणि चालवाव्यात ज्यामुळे शेतकऱ्याला जड झालेला भाकड गोवंश सरकारी गोशाळेत जाईल व शेतकऱ्याला अशी जनावरे कसायला विकायची नामुष्की येणार नाही. त्यामुळे गोवंश हत्येचे गुन्हे कमी होतील. जर शेतकऱ्याने भाकड गोवंश किंवा कोणताही गोवंश विकलाच नाही तर कसायाकडे कापायला गोवंश येणारच नाही आणि हया सर्व बाबींचा विचार करून गोवंश हत्या थांबविण्यासाठी गोवंश विक्री करणाराला सुद्धा मोक्का लावावा अशी मागणी सकल मराठी मुस्लिम समाज व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचाच्या वतीने करण्यात आली .ह्याप्रसंगी अजहर मनेर,अरबाज शेख ,हाजी नदाफ, असिफ नगारजी,सादिकअली बागवान, सादिक बेपारी, जमीर शेख , कुरेशी समाज प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
अनोखे निवेदन
सकल मराठी मुस्लिम समाज व मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यांनी सातारा मधील कुरेशी जमातीच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना गोवंशाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच मुहम्मद पैगंबर यांची शिकवण गाईचे दूध फायदेशीर असून म्हैशीचे मटण फायदेशीर असल्याचे सांगितले तसेच हिंदू धर्मियांची धार्मिक भावना आणि कायदा ह्याचा विचार करता गोवंश न कापला पाहिजे ना विकत घेतला पाहिजे. जर कोणी गोवंश विकायला आला तर पोलिस प्रशासन किंवा आम्हाला कळवा आम्ही त्याचा बंदोबस्त करतो असा इशारा दिला.
