महत्त्वाच्या बातम्या

गोवा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; शर्मिला सिद्दीकींचे राहुल गांधींवर गंभीर आरोप

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्या शर्मिला सिद्दीकी यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता प्रथम निलंबित आणि त्यानंतर सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील काँग्रेस संघटनात्मक कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना सिद्दीकी म्हणाल्या की, गोवा काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व तळागाळातील वास्तवापासून दूर गेले आहे. पक्षासाठी कठीण काळात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यांना पद्धतशीरपणे डावलले जात आहे.

यावेळी त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेल्या भेटीचाही उल्लेख केला. स्थानिक नेत्यांना अचानक पदावरून हटविण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी आपण प्रति निधी मंडळासह त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार देत सर्वांसमोर “बाहेर जा” असे सांगितल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला.

राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या, “राहुल गांधी आम्हाला हुकूमशाही विरोधात आवाज उठवण्याचे आणि सत्यासाठी लढण्याचे आवाहन करतात. मग पक्षातील चुकीच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मला पक्षातून काढून टाकणे आणि सार्वजनिकरीत्या अपमानित करणे योग्य कसे ठरू शकते?”

सिद्दीकी यांनी गेल्या पाच वर्षांतील पक्षाच्या कामकाजाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, स्वतःसह मनीषा उसगावकर आणि अमित पाटकर यांसारख्या नेत्यांनी कठीण काळात पक्ष उभा करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. सोशल मीडियावरील टीका आणि राजकीय दबाव सहन करत पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. मात्र, आता पक्षाची धुरा बाहेरून आलेल्या व्यक्तींकडे सोपवली जात असून, जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे.

“आम्ही गेल्या पाच वर्षांत शेत तयार केले, मशागत केली आणि आता पीक कापणीच्या वेळी बाहेरचे लोक त्याचा लाभ घेत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्थानिक ब्लॉक समित्यांना विश्वासात न घेता बाहेरून आलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी भविष्यात पक्षात आणखी पक्षांतरे होण्याची शक्यता व्यक्त केली. सांताक्रूझ मतदार संघातील अलीकडील उमेदवारीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, निष्ठावान कार्यकर्त्यां पेक्षा इतर निकषांवर उमेदवारी दिली जात असल्याने यापूर्वीही अनेक आमदारांनी पक्ष सोडला होता.

याशिवाय, सध्याच्या राज्य नेतृत्वाखाली निवडणुकीची तिकिटे वाटपा बाबतही गंभीर तक्रारी होत असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भातील काही तक्रारी पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समिती कडेही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी बोलताना सिद्दीकी म्हणाल्या की, अन्यायकारक निष्कासन आणि सार्वजनिक अपमाना नंतरही त्या गप्प बसणार नाहीत. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि पक्षातील कथित मनमानी निर्णयांविरोधात आपण शेवटपर्यंत आवाज उठवत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!