गोव्याच्या लैराई यात्रेत चेंगरा चेंगरीत 6 जणांचा मृत्यू; 60 जण गंभीर जखमी
गोवा: गोव्यातील बिचोलिम येथील शिरगाव गावात यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु याच यात्रे मधे एक धक्कादायक घटना घडली. शनिवारी श्री लैराई जत्रा उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आणि ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोव्यातील शिरगाव जत्रेतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांची ओळख पटली असून सूर्या मयेकर हे बिचोलिम मधील साखळी येथील रहिवासी होते, प्रतिभा कलंगुटकर- कुंभारजुआ, यशवंत केरकर – थिविम, सागर नांदरगे- मठवाडा, पिलिगाव आणि आदित्य कौठणकर आणि तनुजा कौठणकर हे दोघेही औचित वाडा, थिविम येथील रहिवासी आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे ज्यांना रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आले होते. ६० जणांपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे – ज्यामध्ये दोघांना इंट्युबेशन देण्यात आले आहे आणि त्यांना विशेष उपचारांसाठी गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे पाठवण्यात आले आहे.
राज्य सरकार कडून आपत्कालीन मदत सुरु–
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, जखमींवर वेळेवर उपचार करण्यासाठी बिचोलिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मापुसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बांबोलिम येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. अनेक जखमींवर असिलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. वैद्यकीय सेवा मिळाल्यानंतर दोघांना घरी सोडण्यात आले आहे. घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने आपत्कालीन मदत सुरू केली.
विश्वजीत राणे म्हणाले की,”आम्ही १०८ सेवांद्वारे पाच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. तीन असिलो येथे तैनात होत्या आणि परिस्थिती स्थिर होईपर्यंत आणखी तीन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या,” त्यांनी पुढे सांगितले की, सर्व आवश्यक वैद्यकीय व्यवस्था करण्यात आल्या आहेत आणि आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे. “आम्ही प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रतिसादावर देखरेख करण्यासाठी जीएमसी आणि अॅसिलो येथील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित अपडेट्स दिले जातील,” चेंगराचेंगरीचे कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नसून संबंधित अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांना जखमी झालेल्या व्यक्तींवर देखरेखीचे आवाहन– गोव्यातील यात्रेच्या घटने नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सावंत यांच्याशी बोलून सर्व आवश्यक मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जखमींना वैयक्तिकरित्या भेट देण्याचे आणि त्यांच्या उपचारांवर देखरेख करण्याचे आवाहन केले.
