घणसोली नाल्याचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याची शक्यता
घणसोली नवी मुंबईतील घणसोली येथे मोठा नैसर्गिक नाला आहे. दरवर्षी या नाल्यातील गाळ काढण्यात येईल, असे सांगण्यात येते. मात्र, या नाल्यातील गाळ गेल्या कित्येक वर्षांपासून मनपाकडून काढण्यात आला नाही. यामुळे पावसाळ्या अगोदर गाळ काढला नाहीतर येत्या पावसाळ्यात नाल्यातील पाणी नागरी वस्तीमध्ये घुसण्याची भीती या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, माजी नगरसेविका उषा पाटील यांनी वेळोवेळी गाळ काढण्याची मागणी मुख्यालय दरबारी करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रबाळे एमआयडीसी क्षेत्रातील टेकड्यांमधून हा नाला उगम पावला आहे. हा नाला नोसील, घणसोली गावाचा कोपरा ते घणसोली नोडल भागातून खाडीला मिळतो. या नाल्याच्या दोन्हीही बाजूला नागरी वस्ती वसली आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिज, कचरा, वनस्पती, गाळ मोठ्या प्रमाणात साचला असल्याने पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यास नाल्यातील पाणी नागरी वस्तीमध्ये घुसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्यापूर्वी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मार्ग तयार करून दिला जात असला तरी हा उपाय तात्पुरता ठरत आहे. त्यामुळे यंदा अतिवृष्टी झाल्यास २००५ सालची पुनरावृत्ती या भागात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सकारात्मक दृष्टिकोनातून या नाल्यातील गाळ काढून येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाल्यालगत वास्तव्यास असलेले भाजपचे कृष्णा पाटील यांनी केली आहे.
सहा ते सात फूट गाळ
काही उपद्रवी घटक कोणताही विचार न करता कचरा, प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, हार, फुले या नाल्यात टाकतात, तसेच काही भूमाफिया बांधकाम करताना निघणारे डेब्रिज या नाल्यात टाकून देतात. परिणामी या नाल्यात सहा ते सात फूट गाळ जमा झाला असल्याचे येथील नागरिक सांगतात.
