महत्त्वाच्या बातम्या

चोरीचा गुन्हा चोवीस तासांत उघड

       दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ला व रोख रक्कम चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चोवीस तासांत अटक करण्याची कामगिरी दहिवडी पोलिसांनी केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दि २४ रात्री नऊ ते रविवारी दि २५ सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान येथील गुंडगे सुपर मार्केट या किराणा व भुसार मालाच्या दुकानाच्या दरवाजाचे लोखंडी शटर अज्ञातांनी कटावणीच्या साह्याने उचकटले होते. आतून लावलेले नट बोल्ट काढून आत प्रवेश करून दुकानातील कॅश काउंटर व कपाटामधील ठेवलेली ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याबाबत दुकान मालक चैतन्य गुंडगे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

        त्यानुसार गोपनीय बातमीदारामार्फत माहितीच्या आधारे वेटणे (ता. खटाव) येथील सराईत आरोपी अभिजित कालिदास ऊर्फ कायद्या पवार (वय २६) व आदित्य कालिदास ऊर्फ कायद्या पवार (वय १९) यांनी केला असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक

पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे,पोलिस हवालदार सचिन वावरे व बापू खांडेकर, पोलिस नाईक नितीन धुमाळ, महिला पोलिस नाईक निलम रासकर, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे, राम फड व सागर लोखंडे यांच्या पथकाने संशयितांचा पुसेगाव परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेतील २२ हजार ५०० रुपये हस्तगत केले आहेत. सराईत आरोपी अभिजित पवार याच्यावर पुसेगाव आणि सातारा, तर आदित्य पवार याच्यावर पुसेगाव आणि वडूज पोलिस ठाण्यात दरोडा, घरफोडी, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!