महत्त्वाच्या बातम्या

छत्रपतींच्या  शासनाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

       सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारी, अत्याचाराचे प्रमाण वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.आज देशात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.जवळच्या व्यक्ती, नातेवाईक , परिचित, शेजारी यांच्यापासूनच आज महिला असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेश , राजस्थान नंतर महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. विनयभंग, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचारा  बाबतीत महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिवसाढवळ्या महिलांसोबत धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो? 

       इतर राज्यांसारखा आर्थिक प्रगतीचा आणि पुरोगामी पणाचा दावा करणारा महाराष्ट्र सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेबाबत पिछाडीवर आहे. महाराष्ट्र शासनाने अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली पाहिजेत. कठोर शिक्षा दिल्या पाहिजेत. याबाबतीत महाराष्ट्र देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फितुरी करणाऱ्या, महिलांवर अत्याचार, जुलूम करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा सुनावल्या जात होत्या. आज महाराष्ट्रात अत्याचाराचे प्रमाण एवढे वाढले आहे कीअशा गुन्हेगारांना या शिक्षा ठोठावल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्याचा ‘चौरंग’ केला जात असे म्हणजेच एक हात एक पाय तोडला जात असे. फौजदारी व काही दिवाणी स्वरूपाच्या गुन्ह्यात दंड व इतर शारीरिक शिक्षा दिल्या जात असत.
       बाबाजी भिकाजी गुजर म्हणजेच रांझाच्या पाटलाने एका स्त्रीशी बदअंमल (दुष्कर्म) केला म्हणून छत्रपती शिवरायांनी त्याचे हात पाय तोडण्याची शिक्षा दिली. शिवाजी महाराजांचे शासन कठोर होते. शिवकाळात देण्यात आलेल्या शिक्षा या प्रसिद्ध आणि सर्वश्रुत आहेत. स्वतः शिवाजी महाराज गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या बाबतीत अतिशय  कडक होते. 
1.माणकोजी दहातोंडे हे शहाजी राजांकडून आलेल्या मंडळींपैकी एक होते परंतु ते महाराजांचा हुकूम मानत नसत तेव्हा शिवाजी महाराजांनी राजगडाच्या पायथ्याशी शिवपट्टण येथे त्यांना चौरंग म्हणजेच हात कोपरापासून व पाय गुडघ्यापासून छाटून टाकण्याची शिक्षा ठोठावली होती.
2.जावळीचे मोरे घराण्यातील यशवंतराव मोरे व त्यांचा मुलगा कृष्णाजी यांनी रायगडावर असताना आदिलशाहीशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा महाराजांनी त्यांचा शिरच्छेद केला.
3.हिरोजी फर्जंद यांनी महाराज आग्राहून सुटताना मोलाची कामगिरी केली परंतु संभाजी महाराजांच्या काळात मात्र राजद्रोहाच्या कारवायांमध्ये सापडल्याने त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.
4.खंडोजी खोपडे हा अफजलखानाला फितूर झाला म्हणून त्याचा उजवा हात व डावा  पाय कलम करण्याचा आदेश महाराजांनी दिला व त्याची तात्काळ अंमलबजावणी  झाली.
5.प्रभु देसाई हे सुभेदार होते. त्यांच्या पत्नीने सखुजी गायकवाड या सरदाराने गैरवर्तणूक केल्याची तक्रार शिवाजी महाराजांकडे केली त्यावेळी त्याचे डोळे काढून टाकण्याची व अजन्म अंधार कोठडीची शिक्षा सुनावली.
      अशा प्रकारच्या शिक्षा आता महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील गुन्हेगारांना स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना देणे गरजेचे आहे तर आणि तरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यास वचक बसेल. गुन्हेगारांना शासनाच्या कारवाईची भीती उरलेली नाही का?  पोलिसांचा वचक राहिला नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
      महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करायचे असेल तर शासनाने शिवकालीन शिक्षांचा अवलंब करणे आता फायदेशीर ठरेल.  त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल. समाजात स्त्रिया सुरक्षित राहू शकतील. पुन्हा एकदा शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे सुराज्य निर्माण होईल.

नूतन भिसे

उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!