जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिस अधिकारी व महिला अमलदारांची मोफत वैद्यकीय तपासणी
सातारा: 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदारांची वैद्यकीय तपासणी शिबीर अलंकार हॉल येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे हस्ते झाले. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे, डॉ सौ बाबर, डॉ विलास फडतरे, डॉ किरण सोनवलकर, डॉ राहुल खाडे उपस्थित होते.
सदर शिबिर सातारा पोलीस दल व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा, सातारा स्त्री रोग संघटना जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन सातारा व बोकील मेट्रो पॉलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. सदर शिबिर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांनी राबवले. पोलीस दलात पुरुषाबरोबर महिलांना सगळ्या जबाबदारी पार पाडाव्या लागतात त्याचबरोबर संसाराची जबाबदारी असते या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांची पुरती दमछाक होते. यामुळेच महिला आपल्या आरोग्याला दुय्यम स्थान देतात. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर या स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर असल्याने त्यांना महिलांना होणारे आजार त्यातून त्यांची होणारी चिडचिड, कामाचा ताण या बाबी त्यांना माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी हा धागा पकडूनच या शिबिराचे आयोजन केले. त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस महिलांना ही तपासणी सक्तीची केली होती. त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यातून स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरात सातारा जिल्ह्यातील वय वर्ष 30 पुढील सर्व महिला पोलिस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या मध्ये प्रामुख्याने महिलांमध्ये होणाऱ्या स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर तसेच हाडाची ठिसूळता, त्याचबरोबर रक्त तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर ज्या महिलांना आरोग्याच्या तक्रारी असतील त्यावर तात्काळ उपाय सुचवण्यात आले.महिलांसाठी वेगवेगळ्या समस्यांवर आरोग्य विषयक व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मध्ये गंभीर आजार आढळून आल्यास संबंधीत महिला पोलीसांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे . या प्रकारच्या तपासण्या पहिल्यांदाच झाल्याने सर्व महिला पोलीस अधिकारी आनंदीत होत्या.
या वेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर म्हणाल्या, सातारा पोलीस दलामध्ये या तपासणी करण्याची पहिलीच वेळ असून साडेचारशे महिलांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. सदर तपासणी बाजारात करण्यासाठी रुपये 12000 खर्च येतो पण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या महिलांना सदरची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश असा आहे की, महिला आपल्या आरोग्यविषयक उघडपणे बोलत नाहीत त्यांची पहिली पसंती संसार असतो व आरोग्य हे दुय्यम असते या शिबिर द्वारे त्यांना आरोग्याचे महत्व पटवून सांगण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना होणारे कॅन्सर, पाळीचे आजार, मेनोपॉज या विषयावर मार्गदर्शन तसेच घ्यावयाची काळजी या संबंधी माहिती देण्यात आली. तसेच तज्ञ महिला डॉक्टर च्या वतीने त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
