महिला दिनानिमित्त सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये रंगला महिलांचा कौतुक सोहळा
सातारा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सातार शहर पोलीस ठाण्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सर्व महिलांना फेटा परिधान करून पुष्पगुच्छ देऊन एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात महिला काम करत असताना त्यांना नोकरी बरोबरच घरच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात .थोडक्यात त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि याबद्दल त्यांची कोणतीच तक्रार नसते त्यामुळे जागतिक महिला दिन सर्व महिलांचा उचित सन्मान करणे हे सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या सर्व महिला पोलीसांची मोलाची साथ लाभते. त्यामुळे अनेक अवघड गुन्ह्यांचा तपास आम्ही यशस्वी करू शकलो आहोत. त्यामुळे जागतिक महिला दिन या सर्व महिलांचा सत्कार करण्याचे मी माझे कर्तव्य समजतो व याच भावनेने सातारा शहर ठाण्याच्या प्रांगणात सर्व महिलांचा सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर ठाण्याचा आजचा कारभार हा संपूर्ण महिलाच सांभाळणार असून त्याचे नेतृत्व पीएसआय अक्षदा इंगळे या करणार आहेत.या आगळ्या वेगळ्या जबाबदारीने पोलीस महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फेटे धारण केले असल्याने नागरिक कौतुकास्पद नजरेने पाहत होते.
