दिल्लीच्या लाल किल्ला येथे कारचा भीषण स्फोट
दिल्ली येथे आज एक धक्कादायक घटना घडली. आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास लाल किला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे सात गाड्या कामाला लागल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या अधिकाऱ्यांची एक टीम घटनास्थळी दाखल आहे.
स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एनआयएची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात येत आहे. अग्निशमन दलाला संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास स्फोटाची माहिती मिळाली, तर दिल्ली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. स्फोट इतका जोरदार होता की जवळच्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोट झाला तेव्हा परिसरात गर्दी होती.ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारव्यतिरिक्त, त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या इतर तीन वाहनांनाही आग लागली. सूत्रांचे म्हणणे आहे की, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ वर हा स्फोट झाला. टीव्ही रिपोर्ट्सनुसार, एका व्हॅनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर आणखी तीन कारने पेट घेतला. अनेक लोक जखमी झाल्याची भीती आहे. दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
