महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; भाजप कार्यकर्त्यांची रस्त्यावर उतरून काँग्रेसविरोधात घोषणाबाजी

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आता भारतीय जनता पक्ष राज्यभरात आक्रमक झाला आहे. मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. काँग्रेस पक्ष देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.

आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते अमित साटम यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला. स्वतःचे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी राहुल गांधी आणि महाविकास आघाडी देशात अराजकतेची आग पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे साटम म्हणाले. यासोबतच त्यांनी राहुल गांधींना थेट आव्हान देत आपल्या पासपोर्टचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली. राहुल गांधींनी परदेश दौऱ्यांदरम्यान कोणत्या देशांत जाऊन भारतविरोधी शक्तींची भेट घेतली, हे स्पष्ट करावे असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणावर ताशेरे ओढले.

भारत सध्या जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या या प्रगतीला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि भारतविरोधी शक्तींकडून हे राजकीय कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही अमित साटम यांनी केला. दिल्लीतील घडामोडींनंतर आता मुंबईत भाजप आणि काँग्रेसमधील हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून आगामी काळात त्याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!