देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार की महाराष्ट्रातच? अमृता फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या दिल्ली वाऱ्यांवरून आणि भविष्यातील राजकीय प्रवासा बाबत राजकीय वर्तुळात सातत्याने विविध चर्चा रंगत असतात. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत खुद्द त्यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्यासाठी विविध महत्त्वाच्या योजना मंजूर करून आणण्यासाठी जात असतात, असे स्पष्ट करत त्यांनी या चर्चा फेटाळून लावले आहेत.
मागील काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यांमुळे ते आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी सांगितले की, ते दिल्लीचे दौरे निश्चितच करतात, परंतु त्यामागचा उद्देश केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार कडून विविध प्रकल्प व विकास निधी मंजूर करून घेणे हा असतो. ते अहोरात्र महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विकासासाठी झटत आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच मुलाखती दरम्यान त्यांनी देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांवरही आपले मत व्यक्त केले. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी संबंधित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमध्ये बँका शनिवार आणि रविवार सुट्टी जाहीर करतात. मात्र, आपल्या देशात खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये ही सुविधा अद्याप पूर्णपणे रुळलेली नाही. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय असून, यावर संबंधित स्तरावर लवकरच योग्य तोडगा निघेल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात आणि बँक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
