धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवून पोटगी देण्याचे आदेश
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे कोर्टाने 4 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या निकालानुसार, मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत.न्यायालयाने आपल्या आदेशात धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या वैवाहिक नात्याची माहिती दिली आहे. दोघांनी 9 जानेवारी 1998 रोजी आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. अर्जदार करुणा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, तर राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत.
करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, 2018 पर्यंत त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत होते. मात्र, 2000 नंतर धनंजय मुंडे यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्यांनी करुणा शर्मा याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचे अंशतः मान्य केले आहे.
न्यायालयाने आदेश दिला आहे की, करुणा शर्मा यांना महिन्याला 1,25,000 रुपये पोटगी द्यावी, तसेच त्यांच्या मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे. विशेष म्हणजे, अर्जदार करुणा शर्मा यांनी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पोटगीच्या अर्जाचा खर्च म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना 25,000 रुपये द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.या निकालानंतर, अंजली दमाने यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.
