पळशी येथील पाच जणांस तीन वर्षे कारावास; म्हसवड न्यायालयाने ठोठावली शिक्षा
गजीनृत्य कार्यक्रमानंतर जेवणास बसतेवेळी वेळी धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन भावंडास बेकायदा जमाव करुन मारहाण करीत त्यामधील एकावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी पळशी (ता.माण) येथील पाच आरोपीना म्हसवड येथील कनिष्टस्तर प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधिश राजीव बी.बहिरवाल यांनी तीन वर्षे तुरुंगवास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा दि. १ फेब्रुवारी रोजी ठोठावली.
हणमंत मनोहर टकले वय २९ वर्षं , विलास बाबा करे वय ४३ वर्षं बजरंग मनोहर टकले वय २४ वर्षं पोपट संभाजी टकले वय 41वर्षे व मनोहर संभाजी टकले वय ५० वर्षं सर्वजण पळशी, (ता.माण) अशी या शिक्षा झालेली आरोपींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, पळशी (ता.माण) येथे दि.14 ऑक्टोबर 2016 रोजी गजीनृत्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंना जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.माणिक गोविंद करे व त्यांचे बंधू भरत गोविंद करे दोघे रा.पळशी (ता.माण )हे दोघेजण जेवणास बसताना वरील आरोपीनी धक्का का दिला ? या कारणावरुन दोघांनाही बेदम मारहाण केली.त्यानंतर भरत करे याच्यावर चाकूने पाठीत वार करुन गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली या घटनेनंतर माणिक गोविंद करे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात संबंधितांवर फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी वरील पाच जणांवर विविध कलमअन्वये दि 15 ऑक 2016 रोजी गुन्हे दाखल केले होते.
या घटनेनंतर म्हसवड न्यायालयात दि .5 ऑगस्ट 2017 पासुन संबंधित पाच आरोपीवर पोलिसांनी फोजदारी खटला दाखल केला होता. न्यायालयाने पोलिसांनी केलेला तपासाचा अहवाल बरोबरच या गुन्ह्यात वापरलेला व पोलिसांनी जप्त केलेला धारदार चाकू, जखमीवर वैद्यकिय उपचार केलेले वैद्यकिय अधिकारी व फिर्यादीच्या वतीने न्यायालयापुढे साक्षीदारांनी उपस्थित राहून दिलेली साक्ष जखमी झालेल्या भरत करे यांचा सातारा येथील शासकिय रुग्णालयात उपचार केलेला वैद्यकिय अहवाल या बरोबरच सरकारी वकील एस एस नदाफ यांनी फिर्यादीच्या वतीने न्यायालयासमोर केलेले न्यायनिवाडेसह अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरुन वरील पाच आरोपीवर न्यायालयात आरोप सिध्द झाल्याने या खटल्यात विविध कलम अन्वये एकत्रित अशी तीन वर्षे तुरुंगवास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा या पाच आरोपींना न्यायाधिशांनी सुणावली.
दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा या पाच जणांस एक ते दोन महिने शिक्षा केली असुन दंडाची वीस हजार रुपये रक्कम या घटनेतील गंभीर जखमी झालेले भरत गोविंद करे यांना देण्याचेही आदेश न्यायाधिशांनी दिले.
या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड.एन एच काझी यांनी काम पाहिले.
