महत्त्वाच्या बातम्या

धायरीत गावठी पिस्तूलासह दोघांना अटक; नांदेडसिटी पोलिसांची कारवाई

पुणे: पुणे शहरातील धायरी परिसरात बेकायदा अग्निशस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघा तरुणांना नांदेडसिटी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वी कारवाई करत जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात मध्यंतरी वाढत्या शस्त्रांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

   अनिल प्रकाश लोहबंदे (वय २०, रा. बेनकर वस्ती, धायरी) आणि वैभव महादेव पोळेकर (वय २१, रा. पोकळे वस्ती, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार आपापल्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार भीमराज गांगुर्डे यांना गोपनिय माहिती मिळाली की, कैलास जीवन फॅक्टरी परिसरात एक तरुण हत्यार बाळगून फिरत आहे. या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संबंधित परिसरात सापळा रचला आणि संशयित अनिल लोहबंदे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

     पोलिसांनी पोलिसी बडगा दाखवून केलेल्या चौकशीत अनिल लोहबंदे याने आणखी एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आपला मित्र वैभव पोळेकर याच्याकडे दिल्याची धक्कादायक माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित पोकळे वस्ती परिसरात धाव घेत वैभव पोळेकर यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे तरुण ही शस्त्रे कोठून घेऊन आले होते, ती कशासाठी बाळगली होती आणि त्यांचा घातपाताचा किंवा गुन्हेगारी कृत्याचा काही हेतू होता का, याबाबतचा सखोल तपास आता नांदेडसिटी पोलिसांकडून केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!