पळशीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; पुष्पवृष्टी करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला
सातारा: पवित्र माणगंगेच्या तिरावर वसलेल्या माण तालुक्यातील पळशी गावातील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र पौर्णिमेच्या शुभ सकाळी सूर्योदय होताच बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय या जयघोषात व टाळ्यांच्या गजरात सहा वाजून अठरा मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली. श्रीराम नवमी ते श्री हनुमान जन्मोत्सव हा हनुमान जयंतीचा कार्यक्रम ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. मंदिरात आरती भजन कीर्तन सेवा अखंड सुरु होती.
यावेळी गावातील अबाल वृद्धासह सर्व मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. अलोट गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला. पळशी गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हनुमंत राया जागृत देवस्थान असलेची प्रचिती आहे. या दैवताच्या आशीर्वादाने गावाचा नावलौकिक राज्य, देशासह जगाच्या पटलावर उमटलेला पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांचे गाव म्हणून पळशीची ख्याती निर्माण झाली आहे. कष्टकरी शेतकरी व्हाया अधिकाऱ्यांच्या गावांत सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत तसेच हनुमान जयंती, यात्रेच्या निमित्ताने गाव एक कुटुंब या भावनेने एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळते. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून उपस्थितांनी गावातील सर्व देव देवतांचे पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले.यात्रा कमिटी, श्री हनुमान जयंती उत्सव समिती, अधिकारी, पदाधिकारी मान्यवर वर्ग यांच्यावतीने येणाऱ्या भाविक भक्तांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
