पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंकडून तीव्र निषेध
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ नागरिक मृत्यूमुखी पडले, तर अनेकजण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड व संतापजनक आहे. या क्रूर हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्यात जे निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, अशी भावना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.
पहलगाममधील घटनेत महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून आणखी दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जखमी पर्यटकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाशी संपर्कात आहोत. याबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाजी यांच्याशी, तसेच तेथील पर्यटन विभागाचे सचिव आणि अनंतनाग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी स्वत: संपर्क साधून माहिती घेतली. याप्रसंगी हल्ल्यात जखमी झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत आणि पहलगाम व नजिकच्या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना प्रवास व वास्तव्य याबाबत आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांना केल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तसेच पहलगाम व नजिकच्या परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. जम्मू-काश्मीर प्रशासनाशी आम्ही यादृष्टीने सदैव संपर्कात आहोत, अशी माहितीही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच हशतवादाविरोधातील लढाईत महाराष्ट्र सदैव जम्मू-काश्मीरसोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
