पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार
पालघर: पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे सुमारे १ हजार ३९५ एकर जागेवर जागतिक दर्जाचा आणि सर्व सुविधांनी युक्त असा अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या हजारो नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच दापचरी येथील या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या नियोजनाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यावेळी पालघरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री रावल यांनी प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण भूखंडाची पाहणी करत गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग आणि नवा मोहरा कृषी विभाग यांसारख्या विविध परिसरांचा बारकाईने अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
फ्रान्समधील जगप्रसिद्ध ‘रुंगीस मार्केट’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ही अत्याधुनिक आणि जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल या बाजारपेठेत सहज उपलब्ध करून देता येईल. वाढवण बंदर, रेल्वे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि भविष्यातील विमानतळ या सर्व महत्त्वाच्या दळणवळण सुविधांच्या सानिध्यात हा प्रकल्प एक ‘इंटिग्रेटेड मल्टी-मोडल कृषी लॉजिस्टिक्स हब’ म्हणून विकसित केला जात आहे. येथे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांसारख्या सर्व कृषी उत्पादनांसाठी अत्याधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक (कोल्ड स्टोरेज) आणि थेट निर्यातीची सोय उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा स्थानिक नागरिकांना आणि युवकांना होणार असून याद्वारे सुमारे १० हजार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना आणि कामगारांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, लॉजिस्टिक्स, पॅकिंग आणि वाहतूक या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. याशिवाय, पालघर परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांना आपला शेतीमाल किंवा उत्पादने विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी येथे लांब जावे लागणार नाही. त्यांच्याच परिसरात जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाचेल,मालाला योग्य भाव मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवी गती प्राप्त होईल.
हा प्रकल्प उभारताना कोणत्याही नागरिकाचे किंवा कुटुंबाचे विस्थापन केले जाणार नाही, ही या योजनेची महत्त्वाची बाजू आहे. अनेक वर्षांपासून उपयोगाविना पडून असलेल्या सरकारी जमिनीचा सुनियोजित वापर करून हा प्रकल्प उभारला जात आहे. वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडणी असल्यामुळे निर्यातीची प्रक्रिया अत्यंत सुलभ होईल आणि लॉजिस्टिक खर्चात मोठी बचत होईल. हा प्रकल्प केवळ एक व्यापारी बाजारपेठ नसून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक क्षितिजावर नेणारा आणि पालघर जिल्ह्याला कृषी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवणारा एक दूरगामी उपक्रम ठरेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.
