पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पुणे : ‘पिंजरा मत्स्यसंवर्धन’ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे यांनी कळविली आहे. ‘पिंजरा मत्स्यसंवर्धन’ हे तंत्रज्ञान किफायतशीर होण्यासाठी टँक उभारल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह शास्रोक्त पद्धतीने माशांच्या आरोग्य व्यवस्थापनाविषयी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या तंत्राबाबत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरासंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड व परभणी या जिल्ह्यांतील पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (पीएमएमएसवाय) अंतर्गत सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
