महत्त्वाच्या बातम्या

पीव्ही सिंधू न खेळता जपान ओपनच्या उपांत्य फेरीत

टोकियो:

आगामी एशियन गेम्स २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा जगतातून एक अत्यंत आनंददायी आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने जपान ओपन स्पर्धेत थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत कोर्टवर न उतरताच विजय मिळाला. विशेष म्हणजे, तब्बल ९९८ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंधूने बीडब्ल्यूएफ (BWF) ७५० सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, एशियन गेम्सपूर्वी तिला तिची जुनी लय पुन्हा सापडल्याचे चित्र दिसत आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पीव्ही सिंधूचा सामना जपानची बलाढ्य खेळाडू आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन नोजोमी ओकुहारा हिच्याशी होणार होता. मात्र, ओकुहारा सध्या गंभीर दुखापतीने त्रस्त असल्यामुळे ती सामन्यासाठी कोर्टवर उतरू शकली नाही आणि तिने माघार (रिटायर्ड हर्ट) घेतली. यामुळे सिंधूला थेट पुढे जाण्याची संधी मिळाली आणि तिचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले.

आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पीव्ही सिंधू समोर चीनच्या माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चेन युफेई हिचे मोठे आव्हान असणार आहे. चेन युफेईने २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावले असल्याने हा उपांत्य फेरीचा सामना कमालीचा अटीतटीचा ठरणार आहे. या महामुकाबल्याकडे आता जगातील तमाम बॅडमिंटन चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!