महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी दिलासा; ई-चलन दंडवसुलीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पुणे: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि वारंवार होणाऱ्या प्राणघातक अपघातांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून केवळ चलन वसुली किंवा दंडात्मक कारवाईत अडकून न राहता, प्रत्यक्ष वाहतूक सुरळीत करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार, आगामी ३१ ऑगस्टपर्यंत शहरात ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ (Enforcement Holiday) लागू करण्यात आला असून, सर्व ई-चलन मशीन वाहतूक मुख्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूक शाखेचा कारभार सुधारण्यासाठी आणि प्रत्यक्ष चौकात पोलिस उपस्थिती वाढवण्यासाठी आयुक्तांनी काही कडक नियमावली जारी केली आहे.

         सामान्य कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर केली जाणारी ई-चलन कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे. आता केवळ पोलिस उपनिरीक्षक (PSI) व त्यावरील दर्जाचे अधिकारीच जड वाहनांची नियमभंग प्रकरणे, ‘नो एंट्री’मधील प्रवेश आणि इतर गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनद्वारे कारवाई करू शकणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा ओढा केवळ वसुलीकडे न राहता वाहतूक व्यवस्थापनाकडे केंद्रित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

     प्रमुख चौक व रस्त्यांवर वाहतूक अंमलदारांची नेमणूक बंधनकारक करण्यात आली आहे. कोणतेही पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी आपल्या विभागाच्या कार्यालयात किंवा चौकीत थांबून राहणार नाहीत. सकाळच्या, संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात जोपर्यंत वाहतूक कोंडी कायम आहे, तोपर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर आणि चौकातच उपस्थित राहावे लागेल. शहरात प्रामुख्याने सोमवारी आणि शुक्रवारी वाहनांची प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडी होत असते. हे लक्षात घेऊन, अप्पर पोलिस आयुक्त आणि वाहतूक पोलिस उपायुक्तांनी या दोन दिवशी कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्याला साप्ताहिक सुट्टी देऊ नये, असे सक्त आदेश दिले आहेत. या दिवशी सर्व कर्मचारी रस्त्यावर राहून कोंडी सोडवतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

         मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर (Drunk and Drive) कारवाई करताना पारदर्शकता राहावी, यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीत ही ठिकाणे निश्चित केली जातील. अशा कारवाईपूर्वी अप्पर पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी वारंवार तेच कर्मचारी नेमले जाणार नाहीत. ही संपूर्ण कारवाई अनिवार्यपणे ‘बॉडी कॅमेरे’ (Body Cameras) चालू ठेवूनच करावी लागेल आणि कारवाईत कसूर न होण्यासाठी अचानक ‘डमी डिक्वॉय’ पाठवून पडताळणी केली जाणार आहे.

        शहरातील वाहतूक कोंडीचे व अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ शोधून सिग्नलच्या वेळेचा अभ्यास केला जाईल. सिग्नल सिंक्रोनायझेशन, कॉर्नर पार्किंग, चौकात उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि कोंडीच्या ठिकाणी वाहनांच्या थांबण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, सीसीटीव्ही आणि आयसीसीसी (ICCC) कक्षामधून वाहतूक कर्मचारी प्रत्यक्ष चौकात आहेत किंवा नाही, यावर बारीक नजर ठेवली जाईल. जर एखाद्या भागात मोठी कोंडी झाली, तर स्थानिक पोलीस ठाण्यातील अंमलदारांना तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

         या सर्व उपाययोजनांमुळे पुणेकरांना वाढत्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसांचा मुख्य भर आता दंड वसुलीपेक्षा शिस्तबद्ध वाहतूक नियंत्रणावर असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!