महत्त्वाच्या बातम्या

‘पुणे पॅटर्न’ देशपातळीवर निर्माण व्हावा; डीजे-लेझरमुक्त गणेशोत्सवासाठी मेधा कुलकर्णींचा आग्रह

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याची ओळख जगभरात एका वेगळ्याच संस्कृतीसाठी आणि ऐतिहासिक वारशासाठी आहे. मात्र, अलीकडच्या काळात सण-उत्सवांचे बदलत चाललेले स्वरूप आणि कर्णकर्कश डीजेच्या संस्कृतीवर राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत तीव्र आणि परखड शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याने गणेशोत्सवाचा एक आदर्श आणि अनुकरण करण्यायोग्य असा ‘पुणे पॅटर्न’ तयार करावा, जिथे डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईट आणि कर्णकर्कश आवाजाला पूर्णपणे फाटा दिला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही जाती-धर्माचा सण असला, तरी कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

        दहीहंडी आणि गणेशोत्सवा दरम्यान होणाऱ्या नृत्यांवर आणि प्रकारांवर स्पष्ट शब्दांत भाष्य करताना खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, अर्धनग्न अवस्थेत येऊन अंगविक्षेप करणे हे श्रीकृष्णाला किंवा लाडक्या बाप्पाला तरी कधी आवडेल का? याचा गांभीर्याने विचार संबंधित गणेश मंडळ, कार्यकर्ते आणि लोक प्रतिनिधींनी करायला हवा. उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेली ही सांस्कृतिक घसरण थांबली पाहिजे, असे सांगत त्यांनी अयोग्य वर्तनावर थेट बोट ठेवले. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात गुटखा किंवा आरोग्याला घातक असणाऱ्या उत्पादनांच्या छुप्या (सरोगेट) जाहिरातींना कोणत्याही मंडळाने थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

         गेल्या अनेक वर्षांपासून डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आपण आवाज उठवत असल्याचे सांगत डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात डीजेचा दणदणाट पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गोंगाटामुळे नागरिकांना स्वतःच्याच शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी त्यांनी केली.

        लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनाच्या आणि देशप्रेमाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. या उत्सवात व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या समाजोपयोगी गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे. पुण्यातील बरीच मंडळे आजही याच विचाराने प्रबोधनपूर्ण उत्सव साजरा करतात, ज्यांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा, असे त्यांनी कौतुकाने नमूद केले. यंदा पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी डीजेचा वापर न करता अत्यंत विधायक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून, इतरांनीही त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

       पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाबाबत बोलताना त्यांनी परदेशातील नियमांचा दाखला दिला. आपल्या देशात पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक असून, आता वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर प्रत्येकाने यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. काही जागरूक नागरिकांनी मांडलेली भूमिका ही समाजहिताची असल्याने तिला आस्तिक किंवा नास्तिकतेच्या वादात अडकवता कामा नये. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करतानाच सभ्यता राखावी आणि सर्वसामान्य पुणेकरांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करावी, असे परखड मत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!