महत्त्वाच्या बातम्या

शिवाजीनगर मध्ये एमडी ड्रग्ज तस्कर अटकेत; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिवाजीनगर परिसरात अत्यंत गोपनीय आणि यशस्वी कारवाई करत मेफेड्रॉन (एमडी) हा घातक अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तस्कराला जेरबंद केले आहे. आसिफ अब्दुल शेख (वय २६, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून मेफेड्रॉनसह स्कूटर आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता पावले अधिक तीव्र केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

        पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार नियमित गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांना गुप्त बातमीदारा मार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली होती. आसिफ शेख हा तरुण शिवाजीनगर परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्याचे नियोजन केले. त्यानुसार, २७ ऑगस्टच्या रात्रीपासून २८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत पोलिसांनी शिवाजीनगर मधील संचेती चौक परिसरातील आंबेडकर रोडवरील टाटा टेलिबिझनेस सर्व्हिसेस इमारती समोर कसून पाळत ठेवली. पहाटे सुमारे ५:२७ वाजता आसिफ शेख हा सुझुकी बर्गमॅन स्कूटरवरून त्या ठिकाणी आल्यानंतर सतर्क पोलिसांनी त्याला तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले.

       ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंदाजे २७ हजार ६६० रुपये किमतीचे ९.२२ ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त करण्यासोबतच त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्कूटर आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५२ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गंभीर प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

        ही धडक आणि यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) हसन गौहर आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या सूचने नुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक पोलीस फौजदार विठ्ठल साळुंखे तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!