महत्त्वाच्या बातम्या

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मुंढव्यातून १४ चोरीचे मोबाईल जप्त; दोन सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे: पुणे शहरात मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक अत्यंत यशस्वी कारवाई करत दोन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तब्बल २ लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ चोरीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशातील मोबाईल लांबवणाऱ्या या चोरट्यांच्या अटकेमुळे परिसरातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

       अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. थिटे वस्ती, खराडी) अशी आहेत. मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या एका गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना पोलिसांनी आधुनिक तांत्रिक विश्लेषणाचा आणि उपलब्ध पुराव्यांचा प्रभावी वापर केला. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींचा छडा लावून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे एकूण १४ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्या नुसार जप्त करण्यात आलेल्या या सर्व मोबाईलची एकत्रित बाजारातील किंमत २ लाख २७ हजार रुपये इतकी आहे.

      ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक व गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सागर गोडे यांच्या सूचने नुसार या कारवाईचे नियोजन करण्यात आले. तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक, तसेच पोलीस अंमलदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर आणि अक्षय धुमाळ यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास पोलीस अंमलदार विनोद साळुंके करीत आहेत.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!