पुणे पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना सेवा पदके जाहीर
पुणे: पोलिस दलातील उल्लेखनीय, निष्कलंक आणि दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यंदाच्या (२०२६) केंद्रीय पोलिस दलाच्या ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहेत. या मानाच्या पदकांमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील विविध महत्त्वाच्या पोलिस युनिट्समध्ये कर्तव्य बजावणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, या पुरस्कारांमुळे पुणे पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोलिस दलात निष्ठावान सेवा बजावल्याबद्दल पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना प्रतिष्ठित अशा ‘अतिउत्कृष्ट सेवा पदकाने’ गौरविण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद, मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे, पुणे शहराचे अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील व राजेश बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपअधीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे, पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्रसिंह प्रभुसिंग गौर, सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे एस. व्ही. पाठक तसेच माहिती-तंत्रज्ञान व परिवहन मुख्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक दीपक शिंदे, विजय कुंभार आणि संतोष महाडीक या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
याचबरोबर, उत्कृष्ट कार्यपद्धती आणि कर्तव्यनिष्ठा दर्शविणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहराचे सहपोलिस आयुक्त संजय दराडे, लोहमार्ग पोलिसांचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, राज्य राखीव पोलिस दलाचे ग्रुप क्रमांक वनचे कमांडंट रवींद्रसिंह परदेशी, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त नम्रता जी. पाटील (चौहान), गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक वर्षा केदार चौधरी आणि माहिती-तंत्रज्ञान व परिवहन मुख्यालयाचे उपअधीक्षक चंद्रकांत ढाकणे यांचा समावेश आहे. या सर्व सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पोलिस दलातील इतर घटकांनाही उत्तम सेवेसाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
