महत्त्वाच्या बातम्या

पुणे पोलीस भरतीतील बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचे रॅकेट; कोल्हापूरच्या दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या बेड्या

पुणे: पुणे शहर पोलीस दल भरती प्रक्रियेत उघडकीस आलेल्या बहुचर्चित बोगस खेळाडू प्रमाणपत्र प्रकरणात आता खाकीचा सस्राह आणखी तीव्र झाला असून, या रॅकेटचे धागेदोरे थेट कोल्हापूर पर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कुराश’ (Kurash) या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून खेळाडू आरक्षणाचा गैरफायदा घेणाऱ्या या गंभीर प्रकरणाशी संबंध असलेल्या कोल्हापूरच्या एका संशयित दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी कोल्हापुरातून जेरबंद केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

       ऋुती धैर्यशील पुनगावकर (वय ४५) आणि धैर्यशील संभाजीराव पुनगावकर (वय ५१, दोन्ही रा. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना पोलिसांनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या कसून चौकशीतून मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आणि माहितीच्या आधारे या पुनगावकर दाम्पत्याचे नाव पुढे आले होते. हे संशयित दाम्पत्य मुख्य आरोपी सचिव शिवाजी साळुंखे यांचे जवळचे नातेवाईक असून, कोल्हापुरात ते एक क्रीडा अकॅडमी चालवतात. विशेष म्हणजे, कुराश खेळाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली सर्व बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे याच दाम्पत्याच्या अकॅडमीत तयार केली जात होती. एवढेच नव्हे तर, जेव्हा सचिव साळुंखेला पोलिसांनी अटक केली, तेव्हा ही बनावट कागदपत्रे आणि पुरावे लपवून नष्ट करण्याचा सुनियोजित प्रयत्न याच दाम्पत्या कडून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

       या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी असून ती केवळ पुणे पोलिकेदला पुरती मर्यादित नाही, तर त्याचे राज्यव्यापी जाळे पसरले आहे. कुराश असोसिएशनच्या या पदाधिकाऱ्यांनी गेल्या तब्बल अकरा वर्षांत राज्यभरात एक हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे वाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खोट्या प्रमाणपत्रांच्या जोरावर शासनाच्या विविध विभागांमध्ये किती बोगस उमेदवारांनी शासकीय नोकऱ्या मिळवल्या आहेत, याची सखोल पडताळणी सध्या पोलिसांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यातील अन्य विभागांमधील भरती प्रक्रियेतही या रॅकेटचे हात पोहोचल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

       शासकीय नोकऱ्यांमध्ये गुणवंत खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण राखीव असते. याच आरक्षणाचा बेकायदेशीर आणि लाभाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्यक्ष कुराश खेळात कधीही सहभाग न घेतलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळल्याचे भासवून ही बोगस प्रमाणपत्रे वाटण्यात आली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, केवळ पुणे शहर पोलीस दल भरती प्रक्रियेतच अशा प्रकारच्या खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन तब्बल १९ उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा लाभ घेतला आहे. यातील १० उमेदवार सध्या पोलीस प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत, तर इतर ९ जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू झालेले नव्हते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भरती प्रक्रिये दरम्यान या सर्व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची क्रीडा विभागा कडून अधिकृत पडताळणी होऊन त्यांना मान्यताही मिळाली होती. त्यामुळे ही पडताळणी नेमकी कोणत्या त्रुटींच्या किंवा संगनमताच्या आधारावर करण्यात आली, याविषयीचा सखोल तपास आता गुन्हे शाखा करत असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!