महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात डॉक्टरांना ७ कोटींच्या देणुकीचे आमिष; हॉस्पिटल ट्रस्टच्या नावाखाली ८ जणांवर गुन्हा

पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत खळबळ जनक आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलच्या ट्रस्टला तब्बल ७ कोटी रुपयांची मोठी देणगी मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून, विविध कारणांसाठी वेळोवेळी जवळपास २ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील ३८ वर्षीय एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञाने (कार्डिओलॉजिस्ट) दिलेल्या फिर्यादीवरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात आठ जणांवएरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे वैद्यकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी चलबिचल निर्माण झाली आहे.

       प्राप्त माहिती नुसार, फसवणूक झालेले हे तरुण डॉक्टर शनिवार पेठेत राहतात आणि पुण्यातील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच परिचयातील एका व्यक्तीने त्यांची ओळख काही संशयितांशी करून दिली होती. या भामट्यांनी डॉक्टरांच्या विश्वास संपादन करत त्यांच्या हॉस्पिटलच्या ट्रस्टला कॉर्पोरेट वा इतर माध्यमातून थेट ७ कोटी रुपयांची देणगी (डोनेशन) मिळवून देण्याचे मोठे प्रलोभन दाखवले. हा संपूर्ण व्यवहार कागदोपत्री आणि कायदेशीर मार्गाने पूर्ण करण्यासाठी दिल्ली व बंगळूर येथून विशेष प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी येणार आहेत, असा बनाव रचण्यात आला. या परराज्यातून येणाऱ्या प्रतिनिधींच्या प्रवासाचा खर्च, राहण्याची व्हीआयपी व्यवस्था आणि विविध प्रशासकीय कारणांच्या नावाखाली भामट्यांनी वेगवेगळ्या बहाण्याने डॉक्टर साहेबां कडून तब्बल १ कोटी ९७ लाख ६० हजार रुपये लाटले.

     जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत कॅम्प परिसरातील एक हॉस्पिटल आणि मार्केटयार्ड येथील कार्यालयात हा संपूर्ण फसवणुकीचा कट रचण्यात आला होता. एवढी मोठी रक्कम उकळल्यानंतरही जेव्हा प्रत्यक्षात कोणतीही देणगी ट्रस्टच्या खात्यावर जमा झाली नाही, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या प्रसिद्ध डॉक्टरांच्या लक्षात आले. फसवणुकीची खात्री पटताच त्यांनी तत्काळ मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात जाऊन याविरोधात अधिकृत फिर्याद दाखल केली.

       या प्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यात ऋषिकेश गोसावी (रा. पुणे), गणेश अरुण ठाणगे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), अभिषेक सूर्यवंशी (रा. पुणे), मोहंमद (रा. मुंबई), नीतू सिंग (रा. मुंबई), टेरेज विज (रा. बंगलोर), शेख (रा. दिल्ली) आणि अन्य एक अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. या आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीने नेमकी किती जणांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे, याचा कसून शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक गडगडे या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!