महत्त्वाच्या बातम्या

पुणे वाहतूक पोलिसांचा महापालिकेला ‘अलर्ट’ खड्डे, कोंडीवर तातडीने उपायांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आणि तिचे मूळ कारण नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पावले उचलली आहेत. वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता, कोंडी निर्माण करणारी कारणे शोधून ती दूर करण्यासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. विशेषतः शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत असून, या खड्ड्यांची अचूक माहिती महापालिकेला देऊन ती तातडीने बुजवून घेण्यासाठी प्रशासकीय समन्वय साधण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

          शहरातील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पोलीस आयुक्तांनी स्वतंत्रपणे सखोल आढावा घेतला आहे. कोणत्या चौकात आणि नेमक्या कोणत्या कारणामुळे कोंडी होते, याची सविस्तर माहिती नकाशाच्या माध्यमातून समोर आणत ‘कोंडी कुठे आणि का?’ यावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, तसेच वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागल्याने किंवा मार्ग बदलावा लागल्याने वाहतूक विस्कळीत होते. ही बाब गांभीर्याने घेत वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. या खड्ड्यांची सविस्तर माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेला देऊन त्यांच्याशी समन्वय साधत हे खड्डे तत्काळ बुजवून घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जाणार आहे.

       महापालिकेच्या वतीने अनेकदा रस्त्यांवर खड्डे नसल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतांश रस्त्यांची बिकट अवस्था वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर बाधित करत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होत आहे, याची अचूक माहिती मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका यांच्यात योग्य समन्वय साधून नागरिकांना सुरळीत व अडथळाविना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयुक्तांच्या या निर्देशामुळे आगामी काळात पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!