महत्त्वाच्या बातम्या

पुणे विमानतळ परिसरात प्रखर बीम आणि लेझर लाईटवर ६० दिवसांची बंदी

पुणे : लोहेगाव विमानतळ परिसर तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आकाशाच्या दिशेने प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईट सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त तथा विशेष पोलीस महानिरीक्षक आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी संजय दराडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

       लोहेगाव येथील विमानतळावर दिवसा तसेच रात्री विविध विमान कंपन्यांची आणि भारतीय वायुसेनेची विमाने व हेलिकॉप्टर उतरतात आणि उड्डाण करतात. विमानतळा वरील धावपट्टी तसेच एटीसी टॉवर कडून संकेत देण्यासाठी प्रकाशाचा वापर केला जातो. भारतीय वायुसेनेने निदर्शनास आणून दिल्या नुसार, लोहेगाव विमानतळाच्या एअरफिल्डच्या जवळच्या परिसरात तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या वेळी आकाशात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर केला जातो. या प्रकाशामुळे वैमानिकांचे डोळे दिपण्याची शक्यता असून, त्यातून विमान दुर्घटना होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

       या पार्श्वभूमीवर लोहेगाव विमानतळ व नागरी विमानतळाच्या साधारण १५ किलोमीटर अंतराच्या हवाई क्षेत्राच्या परिसरात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश २२ सप्टेंबर २०२६ पासून पुढील ६० दिवस लागू राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा कार्यक्रम आयोजकांनी आकाशाच्या दिशेने प्रखर बीम लाईट अथवा लेझर बीम लाईट सोडू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!