महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आव्हाळवाडीत रंगकामाच्या वादातून सहकाऱ्यानेच केली कामगाराची हत्या; दोघे फरार

पुणे: पुणे शहरातील आव्हाळवाडी परिसरातील एका संस्थेच्या इमारतीत रंगकाम करणाऱ्या एका कामगाराचा त्याच्याच सहकाऱ्यांनी निर्घृण खून केल्याची अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. किरकोळ वादानंतर किंवा आपापसातील संयम सुटल्याने दोन सहकाऱ्यांनी मिळून आपल्या ३७ वर्षीय तिसऱ्या सहकाऱ्याच्या डोक्यात जड व कठीण वस्तूने जोरदार वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर गुन्ह्यानंतर दोन्ही आरोपी कामगार घटनास्थळा वरून पसार झाले असून, वाघोली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, मृत पावलेल्या कामगाराचे नाव धीरेंद्र पासवान (वय ३७, मूळ रा. लकुडी निसफिराय, ता. दुबोली, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. तर सुनिल कुमार (वय ३०) आणि कमलेश (वय ३५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही फरार सहकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी साइटचे सुपरवायझर नितेश राजेंद्र पाटील (वय ३९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. आव्हाळवाडी येथील ‘स्नेहालया विकलांग संस्था‘ संकुलातील एका इमारतीचे रंगकाम करण्याचे काम सुरू होते, ज्यासाठी हे सर्व कामगार एकत्र आले होते. विशेष म्हणजे, ज्या इमारतीचे रंगकाम सुरू होते, त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर हे तिघे कामगार राहण्यासाठीही होते.

        घटनेच्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेपर्यंत काम झाल्या नंतर सुपरवायझर नितेश पाटील हे आपल्या घरी निघून गेले होते, तर हे तिघे कामगार इमारतीवरच थांबले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासात वाजता सुपरवायझर कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी धीरेंद्र पासवान हा वरच्या मजल्यावर संशयास्पद स्थितीत झोपलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते आणि त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, धीरेंद्रचे इतर दोन साथीदार कामगार त्या ठिकाणी कुठेही दिसून आले नाहीत.

      हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर सुपरवायझरने तात्काळ वाघोली पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात धीरेंद्र पासवान याच्या डोक्यात एखाद्या जड आणि कठीण वस्तूने अमानुषपणे मारहाण करून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक फरार झालेल्या दोन्ही आरोपी कामगारांचा कसून शोध घेत आहेत. या अनावधानाने घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे परिसरात काम करणाऱ्या कामगारांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी भीती व संताप व्यक्त होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!