महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात राहुल गांधींच्या स्टेटसवरून राजकीय वाद; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पुणे: पुण्यातील सीओईपी (COEP) महाविद्यालय परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि एनएसयूआय (युवक काँग्रेस) यांच्या कार्यकर्त्यां मध्ये झालेल्या राड्याप्रकरणी आता राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेत युवक काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह तब्बल ५० ते ६० जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. यात अक्षय जैन यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व्हॉट्सॲपवर राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून त्यांना हॉस्टेलमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अभाविपवर केला आहे.

      या संपूर्ण प्रकरणा बाबत तीव्र संताप व्यक्त करताना काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवणे ही अभाविपची गुंडगिरी अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. राहुल गांधी यांचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले म्हणून विद्यार्थिनींना धमकावण्याचा आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार या विद्यार्थ्यांना कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वैचारिक लढाई विचारांनीच जिंकता येत नसल्याने विरोधकांकडून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारला जात असून, हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती बनल्याचा घणाघात त्यांनी केला. अशा प्रवृत्तीच्या गुंडांना सरकारकडून संरक्षण मिळत आहे का, असा सवाल करत विद्यार्थिनींच्या व विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या या दडपशाही विरोधात काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

       काँग्रेस पक्ष नेहमीच सत्य, शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने चालणारा पक्ष असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची कोणीही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सावित्रीच्या लेकींच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी आयोजित करण्यात आलेला संवाद कार्यक्रम सर्व आव्हानांना तोंड देत अधिक दणक्यात पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या अशा प्रकारच्या धमक्यांना आणि दडपशाहीला न जुमानता मोठ्या संख्येने विद्यार्थी राहुल गांधी यांच्या या संवाद कार्यक्रमात उपस्थित राहतील, असे सांगत काँग्रेसने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या घडामोडींमुळे पुणे शहरातील महाविद्यालयीन आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चलबिचल पाहायला मिळत असून पोलीस प्रशासनाकडूनही परिस्थितीवर कडक नजर ठेवली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!