महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मंडळांमध्ये दुजाभाव नको; सर्वांसाठी समान नियमांची मागणी

पुणे: पुण्याचा ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, शहरातील गणेश मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासनाच्या नियमावलीवरून आणि वागणुकीवरून मंडळांमध्ये असंतोष उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याचा गणेशोत्सव काही मोजक्या प्रमुख किंवा मानाच्या मंडळांपुरता मर्यादित न राहता, शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांना समान नियम लागू करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आली आहे. या बैठकीत विसर्जन मिरवणुकीतील नियोजन, ध्वनिप्रदूषणाचे कायदे आणि दंडात्मक कारवायांवरून प्रशासनावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

     खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी गोखलेनगर परिसरातील हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहरातील शेकडो गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विसर्जन मिरवणूक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात त्याची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी होत नाही, असा तीव्र आरोप यावेळी करण्यात आला. विशेषतः टिळक रस्त्यावरील मिरवणूक सातत्याने पुढे सरकत राहावी यासाठीचे केलेले नियोजन केवळ कागदावरच राहिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच, लक्ष्मी रस्ता आणि इतर प्रमुख मिरवणूक मार्गांवर सहभागी होणाऱ्या मंडळांबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोपही समितीने केला आहे.

          ध्वनि प्रदूषणाच्या कारवाई वरूनही बैठकीत प्रशासना विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. मागील वर्षी म्हणजेच २०२५ च्या गणेशोत्सवात सहभागी झालेल्या ३०० हून अधिक मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे खटले दाखल करून त्यांना थेट नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, ज्याचा बैठकीत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. साऊंड सिस्टीम किंवा डीजेप्रमाणेच ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांनाही समान ध्वनीमर्यादा लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, प्रशासनाकडून केवळ डीजे वापरणाऱ्या मंडळांवरच टार्गेट करून दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

       या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणि प्रशासना समोर एकजूट दाखवण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपापले वाद, गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे आणि आगामी उत्सवासाठी एक ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ (Common Minimum Program) निश्चित करावा, असा सर्व संमतीने निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गणेश मंडळांवर दाखल करण्यात आलेले ध्वनि प्रदूषणाचे सर्व खटले बिनशर्त मागे घेण्यात यावेत, तसेच मानाच्या गणपतींपासून ते गल्लीबोळातील लहान-मोठ्या सर्वच मंडळांसाठी मिरवणुकीचा मार्ग, ध्वनी मर्यादा आणि इतर सर्व नियम समान असावेत, या प्रमुख मागण्यांसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला निवेदन देण्याचा निर्णय पुणे शहर गणेशोत्सव समितीने घेतला आहे. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मंडळांच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!