पुणेकरांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नव्या नियोजनाची घोषणा
पुणे: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी नवीन आणि सर्व समावेशक वाहतूक नियोजनाची घोषणा केली आहे. सिंहगड रस्ता, दत्तवाडी आणि मुंढवा या प्रमुख परिसरांमध्ये वाहतूक नियमांत आणि मार्गांमध्ये हे फेरबदल लागू करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला असून, आगामी २१ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना या प्रस्तावित बदलां बाबत आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नोंदवण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
सिंहगड वाहतूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भूमकर चौकातून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मंदिराकडून भूमकर चौकाच्या दिशेने येणारी वाहने आता मंदिराच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरून धावणार असून हा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. तसेच मंदिरा समोरील सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या पुलावर केवळ भूमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार असून, मंदिराकडून या पुलावर येणाऱ्या वाहनांचा प्रवेश पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे या चौकातील वर्दळ नियंत्रित होण्यास मदत होणार आहे.
दत्तवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीत सदाशिव पेठेतील वाहन पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी नवीन व्यवस्था अमलात आणली जात आहे. सदाशिव पेठेतील एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल समोरील रस्त्यावर सुमारे ५० मीटर अंतराच्या पट्ट्यात वाहन पार्किंगसाठी पी-१ आणि पी-२ (P-1 & P-2) ही नवी पद्धत लागू केली जाणार आहे. या भागातून मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्याने, या नव्या पार्किंग व्यवस्थेमुळे शिस्त निर्माण होऊन वाहतूक कोंडी टळेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंढवा वाहतूक विभागांतर्गत वाहन चालकांसाठी महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले असून, मुंढव्यातील आर्मी गेट आणि मेरिट सूट या दोन ठिकाणचे राईट टर्न बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना थेट उजवीकडे वळता येणार नाही. वाहनचालकांना पुढील उपलब्ध वळणाचा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे लागणार आहे. शहरातील विविध भागांत उद्भवणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी हे बदल अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नवीन वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांना किंवा वाहनचालकांना काही सूचना नोंदवायच्या असल्यास, त्यांनी येत्या २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे या पत्त्यावर आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. हे बदल अधिकृतपणे लागू झाल्यानंतर वाहन चालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
