महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात रिअल इस्टेटच्या नावाखाली अडीच कोटींचा गंडा; पाच जणांची फसवणूक

पुणे: रिअल इस्टेट आणि प्लॉटिंगमध्ये आकर्षक परताव्याचे खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ५९ लाखांची फसवणूक केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले आणि सध्या लंडन येथे व्यावसायिक व इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका नागरिकासह एकूण पाच जणांना हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात संबंधित इस्टेट एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

        जितेंद्र अर्जुनदास मुलचंदानी (वय ४३, रा. जरीपटका, नागपूर, सध्या लंडन) यांनी याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी आदित्य भारत गायकवाड (वय ३३, रा. आदित्य बिल्डिंग, सुनितानगर, वडगाव शेरी, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. हा संपूर्ण प्रकार जुलै २०२३ पासून ते आतापर्यंत आंबेगाव येथील मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील कदम प्लाझा येथील एका कार्यालयात घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

        पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी जितेंद्र मुलचंदानी हे सध्या लंडन येथे इंजिनिअर व व्यावसायिक निमित्ताने राहत असून त्यांचे कुटुंबीय महाराष्ट्रात आहेत. आरोपी आदित्य गायकवाड हा एक व्यावसायिक आणि इस्टेट एजंट असून, त्याचे प्लॉटिंग विकसित करण्याचा व्यवसाय आहे. फिर्यादीच्या भावाने यापूर्वी गायकवाड याच्याकडे काही ठिकाणी प्लॉटिंग मध्ये गुंतवणूक केली होती. सुरुवातीच्या काळात आरोपीने या गुंतवणुकीवर काही प्रमाणात चांगला परतावा दिल्यामुळे कुटुंबाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. याच विश्वासाचा फायदा घेत आदित्य गायकवाड याने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यास अवघ्या काही दिवसांत घसघशीत आणि आकर्षक परतावा मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवले.

     या भूलथापांना बळी पडून फिर्यादी जितेंद्र मुलचंदानी यांच्यासह अन्य चार जणांनी मिळून मोठ्या प्रमाणावर आपली रक्कम गायकवाड याच्याकडे सुपूर्द केली. या सर्वांची मिळून एकूण २ कोटी ५९ लाख रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात आली. सुरुवातीच्या काही महिन्यांत संशयित आरोपीने काही ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला गेला. मात्र, त्यानंतर हळूहळू परतावा देणे पूर्णपणे बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांनी आपली मुद्दल आणि ठरलेली रक्कम परत मागण्यासाठी तूप मागेपुढे केल्यावर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

      फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी लंडनहून विशेष करून पुण्यात आले आणि त्यांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी या अर्जाची कसून प्राथमिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीचे सत्य समोर आले. त्यानंतर लंडनहून पुन्हा पुण्यात परतल्या नंतर फिर्यादीची कायदेशीर फिर्याद नोंदवून घेण्यात आली. या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी आदित्य गायकवाड याने आंबेगाव येथील कदम प्लाझा येथील आपले कार्यालय बंद करून काढता पाय घेतल्याचे समजते. आंबेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून, या जाळ्यात आणखी कोणाचे सहभाग आहे का आणि इतर किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!