महत्त्वाच्या बातम्या

विकास निधीच्या वाटपावरून महायुतीत संघर्षाची चिन्हे; टिंगरेंचा निधी शून्य

पुणे: पुणे महानगरपालिका वर्तुळात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष आता विकोपास गेला असून, यामुळे महायुती मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ आता सुहास टिंगरे यांचाही विकास निधी पूर्णपणे शून्य करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नगरसेवकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विकासकामांचे स्वतंत्र ऑडिट करावे, असा प्रस्ताव प्रशासनाकडे दिल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा असून, यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

      या संपूर्ण प्रकरणा बाबत प्रतिक्रिया देताना नगरसेक सुहास टिंगरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कामाची चौकशी व ऑडिट करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावा वर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यामुळेच आपला विकास निधी शून्य करण्यात आला असावा, असा दाट संशय त्यांनी व्यक्त केला आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या कार्यकाळाचा दाखला देत टिंगरे म्हणाले की, अजितदादांवर राजकीय जीवनात अनेक आरोप झाले, परंतु त्यांनी कधीही राजकीय आकस ठेवून किंवा द्वेषभावातून कोणत्याही आमदार किंवा नगरसेवकाचा एक रुपयाचा निधीही कधीही रोखला नाही. आपल्या प्रभागातील प्रलंबित आणि विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी असणारा १२ कोटी रुपयांचा विकास निधी अशा प्रकारे काढणे अन्यायकारक असून, या निधीतून केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामे केली जाणार होती, असे त्यांनी नमूद केले.

       राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महायुतीचे सरकार अत्यंत सुरळीत चालवत आहेत. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत, आणि लोकशाहीत विरोधी पक्षाने आपली भूमिका पार पाडणे हे त्यांचे कर्तव्य असते, असे स्पष्ट करत त्यांनी आपली बाजू मांडली. स्थानिक स्तरावर सत्ताधारी आणि मित्रपक्षांमधील नेत्यांमध्ये निर्माण झालेली ही दरी आणि विकास निधीवरून सुरू असलेली परस्परविरोधी विधाने आगामी काळात पुण्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!