महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ‘AWTIS 2026’; तंत्रज्ञान-नवकल्पनांचा जागर

पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि औद्योगिक नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनण्यास सज्ज झाले आहे. पुण्यातील प्रतिष्ठित जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आगामी १८, १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य स्वरूपात ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या सहभागातून आणि पुढाकाराने होत असलेल्या या तीन दिवसीय परिषदेमध्ये विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील नाविन्य पूर्ण प्रकल्प, उत्पादने आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले जाणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशातील नामवंत तज्ज्ञ आणि विचारवंतांची व्याख्यानेही संपन्न होणार असून, तंत्रज्ञानप्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे.

      या उच्चस्तरीय परिषदेत अर्धसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव (रोबोटिक्स) व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह व प्रक्षेपण वाहने, संरक्षण तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहने, हायड्रोजन अर्थव्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि ग्राफीन यांसारख्या अनेक भविष्यवेधी क्षेत्रांचा समावेश असणार आहे. या परिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ संकल्पना मांडण्या ऐवजी विविध क्षेत्रांतील पूर्ण विकसित उत्पादने प्रत्यक्ष सादर केली जाणार आहेत, तर काही तांत्रिक कारणांमुळे निवडक उत्पादने प्रोटोटाइप स्वरूपात पाहायला मिळतील. याद्वारे उद्योग प्रतिनिधी, संशोधक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कार्यपद्धती अगदी जवळून समजून घेता येणार आहे.

     या तीन दिवसीय आयोजनात स्टार्टअप पॅव्हिलियन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे विशेष दालन (DRDO पॅव्हिलियन) तसेच इंडस्ट्री अँड ॲकॅडेमिक पॅव्हिलियन ही विशेष आकर्षणे ठरणार असून, संशोधन क्षेत्रातील प्रगतीचा आढावा याद्वारे घेतला जाईल. परिषदेच्या कालावधीत दररोज होणाऱ्या तज्ज्ञांच्या सत्रांमध्ये जैवऊर्जा क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशीइस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स’चे उपसंचालक डॉ. नवल किशोर गुप्ताप्रसिद्ध लेखक, व्यवस्थापनतज्ज्ञ व विचारवंत अच्युत गोडबोलेतसेच ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे (ARAI) श्री. संदीप रायरीकर हे हायड्रोजन वाहनांसाठीचा नियामक आराखडा या महत्त्वाच्या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत.

      या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि संशोधकांना अनुभवी दिग्गजांकडून थेट मार्गदर्शन मिळवण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, नवउद्योजक आणि तंत्रज्ञांना उदयोन्मुख संधी, संशोधनातील बदल आणि भविष्यातील औद्योगिक दिशा याविषयी परस्पर विचारांची देवाणघेवाण करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या परिषदेत ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक अजय जगताप, संजय शेंडगे, कामेश मोदी, हायड्रोजन विभागप्रमुख डॉ. विकास शिंदे आणि सौरऊर्जा विभाग प्रमुख भूषण देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!