महत्त्वाच्या बातम्या

फलटणमध्ये पोलिसांचा कडक पवित्रा; १० जणांवर हद्दपारीची कारवाई

सातारा : फलटण शहर आणि परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या १० जणांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत या टोळीतील सर्व १० जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे फलटण परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

      फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळी विरोधात चोरी, जबरी चोरी, खंडणी मागणे, मारहाण करून दुखापत करणे तसेच बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही या आरोपींवर अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हद्दपार करण्यात आलेले १० जण

  • तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे
  • साहिल रवि तारे
  • वैभव बाळासो सस्ते
  • रोहन ऊर्फ यल्या नविन काकडे
  • विनायक बाळासो जाधव
  • राज ऊर्फ राजु राम बोके
  • विजय दत्तु ननवरे
  • गायत्री ऊर्फ प्राची नितीन गाडे
  • सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे
  • राहुल रामचंद्र जगताप

या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या मार्फत प्रस्तावाची सखोल चौकशी करण्यात आली.

       या प्रकरणाची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर संबंधित १० जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार संबंधित आरोपींना संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

        सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सराईत आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गरजेनुसार हद्दपारी सोबतच मोक्का आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर तरतुदींचाही वापर केला जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. या कारवाईमुळे फलटण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका अधिक कठोर झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!