फेक नॅरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर सुप्रिया सुळे – देवेंद्र फडणवीस
पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने वाढणारे शहर आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी दिले. आणि आता भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. एवढ्या पाण्याने शहराची तहान भागणार नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या धरणातून शहराला पाणी आणण्यासाठी उपाययोजना करू. मी या शहराला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथील सभेत दिले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा वाकड येथील कस्पटे वस्ती येथे पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, चिंचवड मतदारसंघात ही सभा घेत असताना लक्ष्मणभाऊंची प्रकर्षाने आठवण येते. स्व. लक्ष्मणभाऊंचा या शहराच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यानंतर अश्विनीताई यांनीही कमी वेळेत अनेक चांगले निर्णय घेत विकासकामे केली. लक्ष्मणभाऊंचे चिंचवडच्या विकासाचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवा. जो विश्वास तुम्ही लक्ष्मणभाऊ व अश्विनीताई यांच्यावर दाखवला तोच विश्वास शंकर जगताप यांच्यावर दाखवा, असे आवाहन फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू केले आहे. मेट्रो आणि पीएमपीएलच्या माध्यमातून नागरिकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा सुरू करून देता येईल यासंदर्भात काम करत आहोत. मेट्रोचे जाळे आपण विणत आहोत. त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे रिंगरोडचे काम सुरू होणार आहे. त्यामाध्यमातून लवकरच वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. विरोधकांकडून रोज उठून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला गेले आहेत, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे.
महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही असं ते म्हणतात. मात्र आज देशात जेवढी गुंतवणूक आली आहे त्यातील 52 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला होता. मात्र महायुती सरकारच्या काळात आपला महाराष्ट्र पुन्हा नंबर १ वर आणण्याचे काम आम्ही केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे या फेक नरेटिव्हचे मालक असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
फेक नरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर सुप्रिया सुळे म्हणतात की हिंजवडीतून आयटी उद्योग पळाले. परंतु हिंजवडीतून एकूण १६ उद्योग राज्याबाहेर न जाता राज्यातीलच नाशिक, संभाजीनगर, नागपूर या भागात गेले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या १६ उद्योगांपैकी १३ उद्योग हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले होते. व महायुतीच्या काळात फक्त ३ उद्योग गेले आहेत. त्यामुळे फेक नरेटिव्हच्या माध्यमातून हिंजवडीला व महाराष्ट्राला बदनाम करणे बंद करा, असा सल्ला फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
