महत्त्वाच्या बातम्या

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; २७ सप्टेंबरला रविवारीही सर्व बँका सुरू राहणार

नवी दिल्ली: बँक कर्मचाऱ्यांच्या आगामी तीन दिवसांच्या देशव्यापी संपामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आर्थिक आणि बँकिंग व्यवहारांवर दीर्घकाळ परिणाम होऊ नये, यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासा दायक निर्णय घेण्यात आला आहे. आगामी २८, २९ आणि ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या प्रस्तावित संपामुळे लागोपाठ सलग दिवस बँका बंद राहण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि व्यवहारांची साखळी अखंडित ठेवण्यासाठी रविवार, २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणि केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने या दिवशी सर्व संबंधित बँक शाखा, कार्यालये, एटीएम-लिंक शाखा तसेच करन्सी चेस्ट पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

         युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या प्रमुख संघटनेने पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करणे आणि इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांच्या जोडीला पुढील तीन दिवस बँका पूर्णपणे बंद राहून सलग पाच दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची मोठी भीती निर्माण झाली होती. जरी सरकार आणि बँक व्यवस्थापना कडून संबंधित कर्मचारी संघटनांना संप मागे घेण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांना ऐनवेळी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासना कडून हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे.

         या नियोजना मुळे ग्राहकांना २७ सप्टेंबर हा रविवार असूनही एक अत्यंत महत्त्वाचा अतिरिक्त कार्यदिवस उपलब्ध होणार आहे, ज्याद्वारे ते आपली प्रलंबित व महत्त्वाची बँकिंग कामे, धनादेश वटवणे, रोख व्यवहार किंवा इतर दस्त ऐवजीकरण सुरळीतपणे पूर्ण करू शकतील. याशिवाय, नेहमीप्रमाणे यूपीआय (UPI), मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा देखील ग्राहकांसाठी पूर्णपणे उपलब्ध राहणार आहेत. संपाच्या या कालावधीत सर्वसामान्य जनतेला किमान त्रास व्हावा आणि देशाची वित्तीय व बँकिंग यंत्रणा गतिमान राहावी, यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

 

 

error: Content is protected !!