महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशात परतण्याचा माझा दृढ निर्धार; २०२४ चे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून संघटित कट: शेख हसीना यांचा मोठा दावा

नवी दिल्ली: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीग पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी एका आभासी पत्रकार परिषदेत अत्यंत मोठे आणि खळबळजनक दावे केले आहेत. २०२४ मध्ये बांगलादेश मध्ये झालेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून तो एक पूर्णपणे संघटित कट होता, असे स्पष्ट करत त्यांनी आपल्याला मारले जाण्याची शक्यता असली तरी, जीव धोक्यात घालून आपण आगामी डिसेंबर अखेर आपल्या मायदेशी नक्की परतणार, असा अत्यंत ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

    दक्षिण आशियाई विदेशी पत्रकार क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आभासी पत्रकार परिषदेत शेख हसीना यांनी तब्बल २५ मिनिटे संवाद साधला. या परिषदेत त्यांचा कॅमेरा बंद होता, तर त्यांच्यासोबत माजी बांगलादेशी क्रिकेटपटू शाकीब अल हसन हेदेखील उपस्थित होते. ५ ऑगस्ट २०२४ रोजी सत्तेवरून पदच्युत झाल्यानंतर भारताने त्यांना आश्रय दिला होता. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ दिला आणि त्या भावूक झाल्या. सध्याचा बांगलादेश हा ३० लाख लोकांच्या बलिदानातून घडलेला देश राहिलेला नाही, अशी तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली.

आंदोलन हिंसक आणि संघटित असल्याचा आरोप:

मागील दोन वर्षांपासून आपल्या प्रिय देशाची होणारी हेळसांड आपण जवळून पाहत असल्याचे त्या म्हणाल्या. २०२४ मधील आंदोलन कधीही शांततापूर्ण नव्हते. आपण सुरुवाती पासूनच चर्चा आणि कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलापरंतु काही संघटित समूहांनी सुधारणांच्या नावाखाली हिडीस राजकारण करत माझा राजीनामा मागितला आणि देशात पद्धतशीरपणे अस्थिरता निर्माण केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आपल्या जीवाला धोका असला तरी डिसेंबर अखेर आपण आपल्या देशात आणि जनतेत परतणारच, या भूमिकेवर त्या कायम आहेत.

अवामी लीगवरील बंदी उठवण्याची मागणी:

यावेळी त्यांनी अवामी लीग पक्षावरील बेकायदेशीर बंदी तात्काळ उठवावी आणि सर्व राजकीय कैद्यांची सन्मानाने सुटका करावी, अशी प्रमुख मागणी केली. देशातील सर्व खोटे गुन्हे रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुनर्स्थापना आणि न्यायिक व्यवस्था बळकट करून तिने मोजक्या शक्तिशाली लोकांची सेवा करण्याऐवजी सर्वसामान्यांचे हित जोपासावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले.

भारत हा आमचा सच्चा मित्र:

या संपूर्ण संकटाच्या काळात भारताने दिलेल्या पाठीब्याबद्दल बोलताना त्यांनी भारताचे मनःपूर्वक कौतुक केले. भारत हा नेहमीच बांगलादेशचा खोटा नाही तर सच्चा मित्र राहिला आहे. १९७१ असो, १९७५ असो किंवा आजचा काळ असो, संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर भारताने आम्हाला मोलाची साथ दिली आहे. राजकीय सरकारांमधील समीकरणे बदलत असली, तरी भारत हा आमचा विश्वासू मित्र होता आणि राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी, कितीही अडचणी किंवा आव्हाने असली तरी आपल्याला अखेर आपल्या मायदेशी आणि जनतेकडे परतायचेच आहे, असा पुनरुच्चार शेख हसीना यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!