भारतीय समाज सेवा केंद्र, पुणे संस्थेमार्फत “कायदेशीर दत्तकत्व ” या विषयी जनजागृती
नोव्हेंबर हा महिना ‘दत्तक महिना’ म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. याचे औचित्य साधून पुणे येथील भारतीय समाज सेवा या संस्थेमार्फत सातारा जिल्ह्यामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून ” मुलांचा संस्थेत सुरक्षित प्रवेश व त्यांचे कायदेशीर दत्तकामार्फत पुनर्वसन” याविषयी जनजागृती केली.
भारतीय समाज सेवा केंद्र ही संस्था सन १९७९ पासून पुणे येथे कार्यरत असून संस्थेच्या शाखा चिपळूण, छत्रपती संभाजीनगर व सांगली येथे आहेत. या संस्थेमार्फत आतापर्यंत १ दिवस ते ६ वर्ष या वयोगटातील ६६०० अनाथ बालकांचा सांभाळ केला आहे व त्यापैकी ४८७० बालकांचे दत्तकामार्फत यशस्वी पुनर्वसन केले आहे . संस्थेचा मुख्य उद्देश प्रत्येक बालकास कुटुंबात वाढण्याच्या अधिकाराचे जतन करणे हा आहे. त्यांचा हा अधिकार जपण्याचे काम संस्था गेली ४५ वर्ष अथकपणे करत आहे.
या संस्थेमार्फत ” मुलांचा संस्थेत सुरक्षित प्रवेश व त्यांचे कायदेशीर दत्तकामार्फत पुनर्वसन ” या विषयावर आधारित पथनाट्याची स्पर्धा जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ सोशल वर्क येथील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. सौ. लता शिंदे यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले.
सदर स्पर्धेसाठी सौ. राजश्री देवकर, सौ. श्रद्धा कोपर्डेकर, सौ. देशमुख मॅडम व धनावडे सर हे परीक्षक म्हणून लाभले. विजेत्या संघांनी सातारा शहरातील पोवई नाका, राजवाडा बस स्टॅन्ड, एस. टी. स्टॅन्ड, सिव्हिल हॉस्पिटल व नर्सिंग कॉलेज तसेच जावळी तालुक्यात आनेवाडी या ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण केले.या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण सोशल वर्क कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शाली जोसेफ, प्राध्यापक श्री. भाईशैलेंद्र माने, डॉ. संपदा संकपाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ. देशमुख व श्री. हेमंत भोसले, सौ सगुणा फरांदे यांचे सहकार्य लाभले.
