महत्त्वाच्या बातम्या

मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात तिसरा मासा गळाला ; कटात सहभाग असल्याचा ठपका

दहिवडी : मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी अनिल जगन्नाथ सुभेदार (रा. दहिवडी) यांना आज अटक करण्यात आली. अनिल सुभेदार यांच्या रुपात याप्रकरणातील तिसरा मासा गळाला लागला असून कटात सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अनिल सुभेदार यांना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

     संपुर्ण राज्यात खळबळ माजविलेल्या व सध्या अधिवेशनात गाजत असलेल्या मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात नवनवीन घटना समोर आहेत. तुषार खरात व एक महिला यांनी जुने प्रकरण उकरून काढून बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या. या बातम्या थांबविण्यासाठी पाच कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार मंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करून तुषार खरात याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने तुषार खरात याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    आज या प्रकरणाने नवीन वळण घेतले व तक्रारदार महिलेला एक कोटीची खंडणी स्विकारताना सातारा येथे अटक करण्यात आली. तर दुसरीकडे या प्रकरणातील तिसरा व्यक्ती असणाऱ्या अनिल सुभेदार याला ताब्यात घेण्यात आले. अनिल सुभेदार यांना अटक केल्याचे समजताच माण तालुक्यात खळबळ माजली.

     याबाबत अधिक माहिती घेतली असता पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काॅल डिटेल्स रिपोर्टचे तांत्रिक विश्लेषण केले असता तुषार खरात, अनिल सुभेदार व तक्रारदार महिला या तिघांनी नियोजन करून पाच कोटी रुपये खंडणीचा कट रचला होता. हे तिघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. जवळपास चाळीस तास (१,४४,२०० लाख सेकंद) एवढ्या मोठ्या प्रमाणात या तिघांनी एकमेकांशी मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच संबंधितांच्या मोबाईल मधील तांत्रिक डाटा जसे मेसेज, काॅल हिस्ट्री, रेकॉर्डिंग्ज हे तपासले असता खंडणी प्रकरणात अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

    एकूणच या गुन्ह्यात नवनवीन घटना समोर येत असून खंडणी प्रकरण अजून कोणा कोणावर शेकणार याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास म्हसवडचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!