मदतीचा बहाणा अन् दिव्यांगाची रोकड लंपास; खडकीतील बँकेत धक्कादायक प्रकार
पुणे: पुण्यातून माणुसकीला काळीमा फाडणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी गेलेल्या आणि शारीरिक लाचार असलेल्या एका ५० वर्षीय दिव्यांग बँक खातेदाराला मदतीचा बहाणा करून लुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. खडकी परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडलेल्या या थरारक घटनेत, खात्यात पैसे भरण्याच्या बहाण्याने एका भामट्याने चक्क दिव्यांगाच्या हातातील सर्व रोकड घेऊन पळ काढल्याने बँक वर्तुळात व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पीडित अपंग व्यक्तीने खडकी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या लबाड चोराचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, फिर्यादी असणारे ५० वर्षीय अपंग नागरिक हे खडकीच्या रेंजहिल्स परिसरात राहतात. गत १५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते औंध रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत स्वतःच्या बँक खात्यात पैसे भरण्यासाठी आले होते. दिव्यांग असल्यामुळे ते व्हिलचेअर वरून प्रवास करत होते. बँकेत आल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती अत्यंत सलोख्याने त्यांच्याजवळ आली आणि “मी तुम्हाला पैसे भरण्यासाठी मदत करतो, तुम्ही काळजी करू नका,” असा विश्वासात घेणारा बनाव रचला. त्या चोरट्याच्या गोड आणि मदतीसाहित बोलण्यावर विश्वास ठेवून त्या असहाय्य दिव्यांग नागरिकाने पैसे भरण्याची अधिकृत स्लिप आणि रोख रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर त्या चोरट्याने पैसे बँकेत जमा केल्याचा बनाव रचत, स्लिपचा अर्धा भाग त्या नागरिकाच्या हातात ठेवून तिथून पोबारा केला.
शारीरिक असमर्थतेमुळे आणि घाईगडबडीत त्या दिव्यांग नागरिकाने स्लिपवर बँकेचा अधिकृत शिक्का किंवा स्वाक्षरी आहे किंवा नाही, याची खात्री केली नाही. काही दिवसांनंतर जेव्हा त्यांनी आपल्या बँक खात्याची पडताळणी केली, तेव्हा खात्यात एकही रुपया जमा झाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपल्यासोबत अत्यंत चलाखीने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी फिर्याद नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी बँक आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी यांच्यामार्फत सुरू असून, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींच्या अशक्तपणाचा फायदा घेणाऱ्या अशा निर्दयी चोराला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
