महाबळेश्वर येथे ०२ ते ०४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी दि. ०२ ते ०४ मे २०२५ या कालावधीत महाबळेश्वर येथे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे या पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व मा. अजितदादा पवार आणि पर्यटन मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली.
प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला-संस्कृती, खाद्यसंस्कृती यांची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीची ओळख करून देणारे कार्यक्रम, तसेच नामवंत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी पर्यटन महोत्सव, तसेच महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहली यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, जलक्रीडा, ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग, घोडेस्वारी इत्यादी साहसी उपक्रमदेखील या महोत्सवात असणार आहेत. तसेच स्थानिक महिला बचतगटांचे हस्त कलाकृतींचे प्रदर्शन व विक्रीचे दालन, खाद्य महोत्सव दालनही महोत्सवात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक आदींचा सहभाग असलेला परिसंवाद कार्यक्रमही या महोत्सवात असणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीला हा महोत्सव निश्चितच चालना देईल, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.
यावेळी मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. चंद्रकांतदादा पाटील, मा. राधाकृष्णजी विखे-पाटील, मा. गिरीशजी महाजन, मा. गुलाबरावजी पाटील, मा. संजयजी शिरसाट यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा-वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
