महाराष्ट्रातील टॉप मोस्ट शिराळा नगरी करण्याचे प्रयत्न करूया – आमदार सत्यजित देशमुख
शिराळा: शिराळा शहराच्या चौफेर विकासाचा नकाशा घेऊन पुढे जाऊन त्यासाठी विकासाची योजना सजगपणे राबविण्याची गरज आहे. त्यातून महाराष्ट्रातील टॉप मोस्ट शिराळा नगरी करण्याचे प्रयत्न करूया असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा नगरपंचायत येथे महाराष्ट्र अग्नीसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अग्नीशमन वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले, तुम्ही कुठे असला तरी आपले काम बोलले पाहिजे. नगरपंचायतीच्या माध्यमातून जनतेला काय हवे ते द्या. गुणवत्तेची कामे होणे गरजेचे आहे. १८ ते २० कोटीच्या निधीचा चांगल्या प्रकारे विनियोग झाला पाहिजे. शिराळ्यात होणारे बगीचे हे नाविन्यपूर्ण व्हायला हवेत. चांगली अभ्यासिका पाहिजे त्यासाठी आमच्या फंडातून लागणाऱ्या काही पुस्तकासाठी आम्ही निधी देऊ.
शहरात कामे करताना ठेकेदारानी लोकांची वाहवा मिळेल अशा पध्दतीने कामे करावीत. या शहरासाठी काहीतरी आगळे वेगळे काम करूया. येत्या अधिवेशनात नागपंचमीच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. सुसज्ज अशी सुंदर नगरपंचायतची इमारत व्हायला हवी.
