माण तालुक्यात भरदिवसा घरफोडी
माण तालुक्यातील येळेवाडी येथे भरदिवसा घरफोडी करून साडे सहा तोळे सोन्यासह चांदी व रोख रक्कम चोरीस गेली आहे. येळेवाडीतील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, भगवान बापूराव दडस (वय : ५५ वर्षे) हे येळेवाडी येथे राहतात. मंगळवार १३ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत घरात कोणीही नव्हते. या दरम्यान चोरट्याने अथवा चोरट्यांनी या घराच्या लोखंडी ग्रील दरवाजाचा कोयंडा कशाने तोडून तसेच आतील लाकडी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख रुपये किंमतीचा माल घरफोडी करून चोरी करून नेला. यात २५ ग्रॅम वजनाची मोहन माळ, ६ ग्रॅम वजनाची एक लाखी ठुशी, १२ ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले मिनी गंठण, ६ ग्रॅम वजनाच्या कानातील रिंगा, १५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, ३ जोड चांदीचे पैंजण, २५ भार वजनाचे चांदीच्या मासोळ्या, बिचवे, चांदीच्या अंगठ्या, रोख वीस हजार रुपये यांचा समावेश आहे. भगवान दडस यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
